जळगावात अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच जळगाव शहरातून पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात नोकरी करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी रोशन मुकेश निकम (वय ३३, रा. निमखेडी, जळगाव) याच्याविरुद्ध बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुणे येथे खासगी नोकरी करते. मार्च २०२४ पासून ते ११ मे २०२६ या कालावधीत आरोपी रोशन निकम याने तरुणीशी जवळीक वाढवत तिला लग्नाचे आश्वासन दिले. प्रेमसंबंधांच्या आडून त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जळगाव शहरातील स्टेशन रोड परिसरातील एका लॉजमध्ये, एमआयडीसी हद्दीतील कुसुंबा नाका परिसरातील ठिकाणी तसेच विविध हॉटेल्समध्ये नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी तगादा लावला असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. याच काळात आरोपीचे दुसऱ्या एका युवतीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पीडितेला मिळाली. याबाबत जाब विचारल्यानंतर आरोपीचा संताप अनावर झाला. त्याने तरुणीला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली तसेच मानसिक छळही केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी रोशन मुकेश निकम याच्याविरोधात बलात्कारासह मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर करीत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत. सदर घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
