केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, ठेकेदारांवर कारवाईचे संकेत
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची तसेच संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर प्रशासकीय कारवाई करण्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली.
असोदा उड्डाणपूल खचल्याची घटना समोर आल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली तसेच नागरिकांशी संवाद साधून समस्यांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या घटनेनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर खासदार स्मिता वाघ आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या मागणीची गंभीर दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी चौकशीचे आदेश दिले.
उड्डाणपूल बांधकामातील त्रुटी, कामाचा दर्जा आणि देखरेखीतील हलगर्जीपणा याबाबत चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याने निकृष्ट दर्जाच्या कामांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या गरजा याबाबतही केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा केली. शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौक तसेच नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिर मार्गावर उड्डाणपूल किंवा वाहनांसाठी भुयारी मार्ग उभारण्याची मागणी त्यांनी केली.
या प्रस्तावांना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भविष्यात जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, अपघातांचे प्रमाण घटण्यास आणि नागरिकांना अधिक सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत खासदार स्मिता उदय वाघ यांनी सांगितले की, “जळगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि प्रलंबित कामांना गती देण्यासाठी माझा पाठपुरावा सातत्याने सुरू राहील.”
असोदा उड्डाणपूल दुर्घटनेच्या चौकशीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या गुणवत्तेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, भविष्यातील कामांमध्ये अधिक पारदर्शकता आणि गुणवत्ता राखली जाईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
