क्रुझरला वाचवताना आयशर रोहित्रावर आदळला अपघातानंतरही शांतता का? वाहनमालकावर कारवाईसाठी ग्रामपंचायतीचे पत्र
साईमत /मुक्ताईनगर/ प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे अवजड मालवाहू आयशर वाहनाने विद्युत रोहित्राला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात महावितरणच्या सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, या प्रकरणात संबंधित वाहनाविरोधात तातडीने कारवाई न झाल्याने महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चांना परिसरात उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांगदेव रस्त्यावरून आयशर वाहन जात असताना समोरून येणाऱ्या क्रुझर वाहनाशी संभाव्य अपघात टाळण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यावेळी आयशर थेट रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या विद्युत रोहित्रावर जाऊन आदळले. या जोरदार धडकेत रोहित्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता.
महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यानंतर नियमानुसार संबंधित वाहनमालकाकडून नुकसानभरपाई वसूल करणे तसेच कायदेशीर प्रक्रिया करणे अपेक्षित असताना, अद्यापपर्यंत ठोस कारवाई झालेली नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे महावितरणच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी. अपघाताचा पंचनामा, नुकसान झालेल्या साहित्याची नोंद, नुकसानभरपाईची प्रक्रिया तसेच संबंधित वाहनाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, चांगदेव ग्रामपंचायतीने याबाबत महावितरणच्या अभियंत्यांना पत्र देऊन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे सरपंच निखिल बोदडे यांनी सांगितले.
याबाबत चांगदेव येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता भोपळे यांच्याशी संपर्क साधला असता, “शुक्रवारी आयशर वाहनमालकाला या प्रकरणी बोलावण्यात आले आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. आता महावितरणकडून संबंधित वाहनमालकावर कोणती कारवाई केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
