वरणगावजवळ ट्रकची दुचाकीला धडक, दोन युवक ठार

0
3

वरणगाव : प्रतिनिधी

शिरसाळे येथील मारुती रायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दोन युवक ठार झाल्याची घटना महामार्गावरील बोहर्डी गावाजवळ शनिवारी पहाटे घडली. दुसऱ्या दुचाकीवरील दोन युवक थोडक्यात बचावले आहे. चौघेही मित्र सावदा येथील रहिवाशी आहेत. घटनेमुळे सावद्याच्या चांदणी चौकात शोककळा पसरली होती. मयत भास्कर कुंभार आणि लखन कुंभार यांच्यावर दुपारनंतर सावदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत भूषण पुर्भी याने दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, सावदा येथील भास्कर पांडुरंग कुंभार, लखन पंकज कुंभार, भूषण चंद्रकांत कुंभार, भूषण किशोर पुर्भी (सर्वांचे वय-१८ ते १९) हे चार शालेय मित्र गेल्या चार शनिवारप्रमाणे शिरसाळे मारोती (ता.बोदवड) येथे दोन दुचाकीद्वारे हतनूर धरणमार्गे शनिवारी, २६ रोजी सकाळी दर्शनासाठी निघाले होते. मात्र, मुक्ताईनगरकडे जात असतांना महामार्गावरील बोहर्डी गावाच्या अवघ्या काही अंतरावर मागील बाजूने भरवेगात येणाऱ्या अज्ञात ट्रकने भास्कर कुंभार याच्या दुचाकीला (क्र. एम.एच. १९/ डीएम८७८९) धडक दिली. त्यामुळे झालेल्या आवाजाने पुढील दुचाकीवर जात असलेल्या भूषण पुर्भी यांनी आपली दुचाकी माघारी फिरवून आपल्या अपघातग्रस्त मित्रांजवळ धाव घेऊन आक्रोश सुरु केला.

एकाचा खासगी रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच बोहर्डी गावातील रवींद्र पाटील आणि निलेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना रिक्षा व दुचाकीद्वारे वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, डॉ. क्षितीजा हेंडवे यांनी भास्कर कुंभार याला मयत घोषित करून गंभीर जखमी लखन कुंभार याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. मात्र, त्याचाही भुसावळातील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे एपीआय आशिषकुमार आडसुळ, पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनीही सकाळी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.

दोन्ही मित्रांवर काळाची झडप

आपल्या मागील मित्राच्या दुचाकीच्या अपघाताचा आवाज येताच पुढे जाणाऱ्या भूषण पुर्भी आणि भूषण चंद्रकांत कुंभार या मित्रांनी त्यांच्याकडे जाण्यासाठी आपली दूचाकी माघारी फिरविली. तेव्हा ट्रक चालकाने त्यांनाही कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते थोडक्यात बचावले. यावेळी चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून भरवेगात पोबारा केला. चारही मित्र महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. ते सावदा येथील डी. एन . महाविद्यालयात बी.ए. च्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होते. अपघातातील मयत भास्कर कुंभार हा हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे गावातीलच चहाच्या दुकानावर काम करून शिक्षण करीत होता. त्याने देव दर्शनासाठी मालकाची दूचाकी घेतली होती. मात्र, क्रुर काळाने दोन्ही मित्रांवर झडप घालून त्यांना कुटुंबापासून हिरावून नेले. घटनेची माहिती सावदा येथे कळताच अनेकांनी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here