मलकापूरजवळ मध्यरात्री झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच गंभीर जखमी उपचारादरम्यान मृत घोषित
साईमत/मलकापूर/ प्रतिनिधी :
मलकापूर परिसरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरालगतच्या जग्गू मामा ढाब्याजवळ भरधाव वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यवतमाळ जिल्ह्यातील ३० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत युवकाचे नाव ध्रुव साहेबराव लांजेवार (वय ३०, रा. दारबा नगर, वाडेगाव, जि. यवतमाळ) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव लांजेवार हे दुचाकीने प्रवास करत असताना अचानक समोरून आलेल्या अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की ते रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमी युवकाला मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे नातेवाईकांवर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. शुभांगी फेंगडे यांच्या माध्यमातून कक्षसेवक संतोष कडू गवळी यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. त्यानुसार मर्ग क्रमांक ३०/२०२६ अन्वये बीएनएसएस कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे करत असून, अपघातानंतर पसार झालेल्या अज्ञात ट्रकचा शोध पोलीस पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रात्रीच्या वेळी होणाऱ्या अवजड वाहनांच्या बेफाम वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
