बॅटरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शास्त्री टॉवर चौकातील बसस्थानकाजवळ बुधवारी (दि. १५ एप्रिल) दुपारी २ वाजेच्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जागरूक नागरिक आणि तरुणांच्या तत्परतेमुळे कारमधील दाम्पत्याचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातील हरिओम नगर येथे राहणारे प्रकाश चिंधा पाटील हे आपल्या पत्नीसह (क्रमांक एमएच १९ बीयू ७५६२) कारने जळगाव शहरातून छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या दिशेने जात होते. शास्त्री टॉवर चौकातून वाहन जात असताना अचानक कारच्या बोनेटमधून धूर येऊ लागला.
धूर दिसताच रस्त्यावरील काही सतर्क तरुणांनी प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा करून चालकाला तात्काळ गाडी थांबवण्यास सांगितले. वेळ न दवडता तरुणांनी धाव घेत कारमधील प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षितपणे बाहेर काढले. काही क्षणांतच वाहनाने पेट घेतल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.
यानंतर तरुणांनी धाडस दाखवत कारचे बोनेट उघडून पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेचा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग पूर्णपणे विझवली.
प्राथमिक अंदाजानुसार, या आगीचे कारण बॅटरीमधील शॉर्टसर्किट असल्याचे समोर येत आहे. या दुर्घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची घटना घडलेली नाही.
भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी सायंकाळपर्यंत पोलिसांत कोणतीही अधिकृत नोंद करण्यात आलेली नव्हती.
