शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या जतनासाठी सुरू केलेल्या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगावची साथ
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या जतनासाठी सुरू केलेल्या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगावात सोमवारी (दि. २०) शांततापूर्ण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगावकर जागृत नागरिकांच्या पुढाकारातून दुपारी १२ वाजता शिवतीर्थ (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर) येथे हे आंदोलन होणार असून, सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
देशाच्या विविध भागांतून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मिळणाऱ्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील नागरिकही लोकशाही पद्धतीने आपला पाठिंबा व्यक्त करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे शासनाने संवेदनशीलतेने पाहावे, पर्यावरण संवर्धनाला विकासाच्या धोरणात प्राधान्य मिळावे आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचा सन्मान राखला जावा, अशी भूमिका या आंदोलनातून मांडण्यात येणार आहे.
यावेळी शांततापूर्ण आंदोलनांवर होणाऱ्या कारवाईबाबतही चिंता व्यक्त करण्यात येणार असून, लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने मत व्यक्त करण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे, अशी मागणी करण्यात येणार आहे. सामाजिक प्रश्नांवर संवादातून तोडगा काढण्याची गरज असल्याचेही आयोजकांनी नमूद केले आहे.
या आंदोलनात विद्यार्थी, शिक्षक, पालक, सामाजिक कार्यकर्ते, विविध स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक, तरुण-तरुणी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी कोणताही राजकीय किंवा पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षणाचा दर्जा, पर्यावरणाचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन हे संपूर्ण समाजाशी निगडित विषय असल्याने प्रत्येक सजग नागरिकाने या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
जळगावातील या शांततापूर्ण आंदोलनाकडे विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संविधानिक मार्गाने समाजहिताचे प्रश्न मांडण्याचा हा प्रयत्न ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
