विठ्ठलनामाच्या गजरात १८ सायकलपटूंची पंढरपूर वारी सुरू
साईमत /भुसावळ /प्रतिनिधी :
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विठ्ठलभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचवितानाच पर्यावरण संरक्षण आणि निरोगी जीवनशैलीचा प्रचार करण्यासाठी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकलवारीला गुरुवारी पहाटे उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. विठ्ठलाच्या नामस्मरणात आणि भक्तिमय वातावरणात १८ सायकलपटूंनी पंढरपूरच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली.
शहरातील श्री विठ्ठल मंदिर परिसरातून सकाळी सहा वाजता सायकलवारीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. प्रस्थानावेळी असोसिएशनचे पदाधिकारी, धावपटू, महिला सदस्य, सायकलप्रेमी आणि विठ्ठलभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड गजराने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
ही सायकलवारी केवळ पंढरपूरच्या दर्शनापुरती मर्यादित नसून समाजात पर्यावरणपूरक वाहतुकीचा स्वीकार, नियमित व्यायामाचे महत्त्व आणि वारकरी परंपरेतील सामाजिक व आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचा व्यापक संदेश देणारी आहे. वाढते प्रदूषण आणि बदलती जीवनशैली लक्षात घेता सायकलिंग हा उत्तम पर्याय असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात येत आहे.
सायकलपटू तीन दिवसांत सुमारे ४३० किलोमीटरचे अंतर पार करणार असून मार्गात दोन ठिकाणी मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे. दररोज जवळपास १७० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत शनिवारी हे सर्व सायकलपटू पंढरपूर येथे दाखल होतील. त्यानंतर राज्यभरातून आलेल्या इतर सायकलवारकऱ्यांसमवेत ते पारंपरिक रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
या सायकलवारीला असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण फालक तसेच विश्वस्त सचिन अग्रवाल, प्रवीण वारके आणि प्रवीण पाटील यांच्या हस्ते ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात आला. उपस्थितांनी सहभागी सायकलपटूंना शुभेच्छा देत त्यांच्या सुरक्षित आणि यशस्वी प्रवासासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
यंदाच्या सायकलवारीत प्रवीण फालक, जगदीश रेहपाडे, युवराज सूर्यवंशी, विश्वनाथ पावरा, अरुण शिंदे, भाऊसाहेब पाटील, मनोज चौधरी, तुषार पोतरवार, गजानन पाटील, अनंता पाटील, मधुकर इंगळे, विद्याधर इंगळे, समीर चौधरी, डॉ. राहुल भोईटे, मनोहर पाटील, सचिन काळे, केतन बुचडे आणि विनय बडगुजर सहभागी झाले आहेत. भक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र स्वागत होत आहे.
