सावद्यातील १५ वर्षीय विद्यार्थ्याचा गारबर्डी धरणात बुडून मृत्यू

0
1

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर

येथील ख्वाजा नगर भागातील आणि ॲंग्लो उर्दु हायस्कुलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय विद्यार्थी शेख ताबिश शेख रमजान मोमीन हा मित्रांसह गारबर्डी धरणावर फिरायला गेला होता. तेव्हा धरणात पाय घसरल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना रमजान ईदच्या दिवशी गुरुवारी, ११ एप्रिल रोजी घडली. या घटनेमुळे त्याच्या परिवारासह ख्वाजा नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

ताबिश शेख याने रमजान महिन्याचे ३० रोजे पूर्ण केले होते. त्याने शहरातील दारुल उलूम गुलशने कादरी येथे पवित्र कुराणाचे तीसपैकी तेरा पारे पाठ केलेले होते. ११ एप्रिल रोजी रमजान ईदचा सर्वत्र उत्साह होता. सकाळी ईदगाहवर सामूहिक नमाज पठण केल्यानंतर तो आपल्या चार-पाच मित्रांसोबत गारबर्डी धरणावर फिरायला गेला होता. तेथे धरणात त्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी समाजसेवक सोहेल खान, आबिद मोमीन, रमजान मोमीन, मोईन खान यांच्यासह वाड्यातीन लोकांनी धाव घेवून मयत ताबिश शेख यास पोलिसांच्या मदतीने रावेर येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविले. परिणामी त्याचे पार्थिव शरीर राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे हे उपस्थित होते. अतिशय शोकाकूल वातावरणात रात्री १० वाजता सावदा येथील कब्रस्तानात त्याचा दफनविधी करण्यात आला. यावेळी शहरासह परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

परिवाराला आ.चंद्रकांत पाटील यांचे मदतीचे आश्‍वासन

घटनेच्या अनुषंगाने मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ.चंद्रकांत पाटील यांनी ख्वाजानगर येथे मयत ताबिश शेख यांच्या राहत्या घरी शुक्रवारी, १२ एप्रिल रोजी भेट दिली. तसेच शासकीय स्तरावर शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत मिळून देण्याचे मयत विद्यार्थ्याचे पालक यांना आश्‍वासन दिले. याप्रसंगी समाजसेवक सोहेल खान, शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी, आरिफ आझाद, नुर महुमद भाई, अय्युब सर, युसूफ शाह, फरीद शेख, निसार अहमद, शेख नाजीम, अशफाक खान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here