घर बंद असल्याची संधी साधली; सेवानिवृत्त व्यक्तीच्या घरावर चोरट्याची नजर; लॅपटॉप, दोन मोबाईल लंपास
साईमत /जळगाव / प्रतिनिधी :
शहरातील टेलिफोन नगर परिसरात घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने घरफोडी करीत लॅपटॉप, दोन मोबाईल आणि रोकड असा ४७ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेलिफोन नगरातील प्लॉट क्रमांक १९ बी, पुष्पक निवास येथे चंद्रसिंग जानराव मोरे (वय ५७) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ते घराबाहेर गेले होते. सकाळी ८.२० वाजेपर्यंतच्या कालावधीत घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला.
घरात शिरल्यानंतर चोरट्याने कपाट व इतर ठिकाणी ठेवलेल्या वस्तूंची तपासणी करून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि रोकडवर डल्ला मारला. यात २० हजार रुपये किमतीचा लेनोवो कंपनीचा लॅपटॉप, १० हजार रुपयांचा आयक्यूओओ निओ ६ मोबाईल, ८ हजार रुपये किमतीचा नार्झो ७० प्रो मोबाईल आणि ९ हजार रुपयांची रोकड असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला.
घरातील वस्तू चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर मोरे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून १२ ऑगस्ट रोजी रात्री ९.३४ वाजता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) नुसार चोरीचा गुन्हा नोंदविला.
घटनेनंतर पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील संशयित हालचाली तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असून, पुढील तपास पोलिस हवालदार सुशील चौधरी करीत आहेत.
