मुंबई
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महायुती सरकारने पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जुलै महिन्याचा हप्ता अद्याप न मिळाल्यामुळे आता येत्या रक्षाबंधन सणापूर्वी जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून ३ हजार रुपये एकत्रच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाण्याची दाट शक्यता आहे. या वितरणासाठी वित्त विभागाच्या मंजुरीनंतर सामाजिक न्याय विभागाकडून ३१९.५३ कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला असून, यासंदर्भात प्रशासकीय स्तरावरून शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.
ऑगस्ट महिना अर्धा संपला तरी जुलैचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे आता रक्षाबंधनाचे औचित्य साधून दोन्ही हफ्ते एकत्र देण्याची तयारी सुरू असल्याचे महिला व बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दुसऱ्या बाजूला, फेब्रुवारी २०२५ पासून सुरू असलेल्या राज्यव्यापी पडताळणी मोहिमेत अनेक अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. कागदपत्रांची अपूर्तता, बँक खाते आधारशी लिंक नसणे आणि ई-केवायसी (e-KYC) न झाल्यामुळे तब्बल ८० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले असून त्यांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
सध्या केवळ पात्र ठरलेल्या महिलांनाच दरमहा १० ते १५ तारखेच्या आत योजनेचा हप्ता नियमितपणे बँक खात्यावर देण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग झाल्याने येत्या काही दिवसांतच पात्र बहिणींच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
