दातांची स्वच्छता, योग्य आहाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
शिवाजीनगर येथील कै. इंदिराबाई पाटणकर पाटण नवीन मराठी शाळेत इंडियन डेन्टल असोसिएशन, जळगाव शाखेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात इंडियन डेन्टल असोसिएशनच्या जळगाव शाखेतील तज्ज्ञ दंतवैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली. डॉ. सौ. वैजयंती पाध्ये, डॉ. योगेश पाटील, डॉ. शुभदा पाटील आणि डॉ. दीक्षा यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून दातांची योग्य निगा कशी राखावी, दात घासण्याची शास्त्रीय पद्धत, तोंडाची स्वच्छता, आरोग्यदायी आहार तसेच दंत आरोग्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये दंत आरोग्याच्या चांगल्या सवयी निर्माण व्हाव्यात आणि दातांच्या विविध समस्यांबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी, हा शिबिराचा प्रमुख उद्देश होता. तपासणीदरम्यान काही विद्यार्थ्यांना दातांशी संबंधित समस्या आढळून आल्यास त्यांना पुढील आवश्यक दंत उपचारांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमासाठी इंडियन डेन्टल असोसिएशन, जळगाव शाखेचे अध्यक्ष, मानद सचिव, सर्व पदाधिकारी तसेच सहभागी तज्ज्ञ दंतवैद्यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक कैलास दिनकर तायडे, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधताना त्यांच्या आरोग्याचीही योग्य काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेच्या वतीने वेळोवेळी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक कैलास दिनकर तायडे यांनी सांगितले. या दंत तपासणी शिबिरामुळे विद्यार्थ्यांना दंत आरोग्याबाबत आवश्यक माहिती मिळून नियमित दातांची निगा राखण्याची सवय लागण्यास मदत होणार आहे.
