अडीच वाजता ‘जिजाऊ’ बस गायब;सकाळी शहापूरजवळ पंक्चर झाल्याने चोरट्याचा डाव फसला
साईमत /जामनेर / प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटनांना आळा बसत नसतानाच आता चोरट्यांनी थेट राज्य परिवहन महामंडळाच्या आगारालाच लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जामनेर एसटी आगारातून नवी कोरी ‘जिजाऊ’ बस अज्ञात इसमाने मध्यरात्री चक्क पळवून नेली. मात्र, जामनेरपासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या शहापूर गावाजवळ खडकी नदीवरील फरशी पुलावर बसचे पुढील चाक पंक्चर झाल्याने संशयिताने ती तेथेच सोडून पलायन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकारामुळे एसटी प्रशासनासह जामनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जामनेर आगारातील एमएच १९, एनई ४२१४ क्रमांकाची नवी कोरी ‘जिजाऊ’ बस रविवारी मध्यरात्री आगारातून गायब झाली. सोमवारी सकाळी शहापूर गावातील ग्रामस्थांना खडकी नदीवरील फरशी पुलावर एसटी महामंडळाची बस बंद अवस्थेत उभी असल्याचे दिसून आले. गावातील रस्त्यावर अशा प्रकारे नवी बस उभी असल्याने ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी बसची पाहणी केली असता ती जामनेर आगाराची असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, शहापूर गावात जामनेर आगारातील काही चालक व वाहक वास्तव्यास आहेत. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बसची पाहणी केल्यानंतर हीच बस जामनेर आगारातून गायब झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांना घटनेची माहिती देण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने जामनेर आगारात प्रवेश करून नवी कोरी बस बाहेर काढली. त्यानंतर बस जामनेर शहरातून शहापूरच्या दिशेने नेण्यात आली. खडकी नदीवरील फरशी पुलाजवळ आल्यानंतर बसचे पुढील चाक पंक्चर झाले. त्यामुळे बस पुढे नेता न आल्याने संशयिताने ती पुलावरच सोडली आणि घटनास्थळावरून पसार झाला.
ही ‘जिजाऊ’ बस जामनेर आगारातून जळगाव-नेरी-जामनेर मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी धावत असते. प्रवाशांच्या सेवेसाठी नुकतीच वापरात आलेली नवी कोरी बस थेट एसटी आगारातूनच पळवून नेण्यात आल्याने आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगारात सुरक्षेसाठी उपाययोजना असतानाही चोरट्याने बस बाहेर कशी काढली, याबाबत आता विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणी आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान, आगार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रणात संशयित कैद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेऊन संशयिताची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.
नवी कोरी एसटी बस आगारातूनच चोरीला गेल्याने या घटनेने जामनेर परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांसमोर आता बस चोरी करणाऱ्या संशयिताचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
