एम. जे. कॉलेज परिसरातील घटना; रामानंदनगर पोलिसांत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
साईमत /जळगाव / प्रतिनिधी :
शहरातील एम. जे. कॉलेज परिसरात भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या रिक्षाने १७ वर्षीय मुलीला जोरदार धडक दिल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली असून, अपघातानंतर रिक्षाचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीक्षा दीपक मगरे (वय १७, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) ही एम. जे. कॉलेजजवळून जात असताना बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमसमोर हा अपघात झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अज्ञात रिक्षाचालकाने रिक्षा भरधाव वेगाने व बेदरकारपणे चालवित दीक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली. अपघातानंतर रिक्षाचालकाने जखमी मुलीला मदत न करता रिक्षासह तेथून पळ काढला.
घटनेनंतर जखमी दीक्षाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, तिचे वडील दीपक नाना मगरे (वय ३८, व्यवसाय मजुरी, रा. हरिविठ्ठल नगर) यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून ८ ऑगस्ट रोजी रात्री १०.५२ वाजता अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २८१, १२५(ब), १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ व १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गुन्हा नोंद क्रमांक २२५/२०२६ आहे.
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल हेमंत कळसकर हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षाचा व चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
