४०० हून अधिक नागरिकांचा सहभाग न्याय विश्वास फाउंडेशनच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
सर्वसामान्य नागरिकांना कायद्याची योग्य माहिती मिळावी, त्यांच्या विविध कायदेशीर अडचणींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे आणि न्यायव्यवस्थेबाबत नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांच्या पुढाकाराने ‘न्याय विश्वास फाउंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंप्राळा येथील ठाकूर समाज मंगल कार्यालयात रविवारी (९ ऑगस्ट) सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर पार पडले. पिंप्राळा, खोटेनगर परिसरासह जळगाव शहर व जिल्ह्यातील ४०० हून अधिक नागरिकांनी शिबिरास उपस्थित राहून आपल्या विविध कायदेशीर प्रश्नांवर तज्ज्ञ वकिलांकडून मार्गदर्शन घेतले.
दैनंदिन जीवनात नागरिकांना जमिनीचे वाद, मालमत्तेचे प्रश्न, सातबारा उतारे, पती-पत्नीमधील वाद, कौटुंबिक समस्या, पोलीस तक्रारी, एफआयआर, न्यायालयीन प्रक्रिया तसेच विविध कायदेशीर कागदपत्रांशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा कायद्याची पुरेशी माहिती नसल्याने नागरिक चुकीचे निर्णय घेतात किंवा अनावश्यक आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जातात. ही बाब लक्षात घेऊन फाउंडेशनच्या वतीने नागरिकांना थेट तज्ज्ञ वकिलांशी संवाद साधण्याची आणि कोणतेही शुल्क न आकारता आपल्या समस्यांवर कायदेशीर मार्गदर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
शिबिरात विविध विषयांवरील कायदेशीर प्रश्न नागरिकांनी तज्ज्ञ वकिलांसमोर मांडले. संबंधित प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया कोणती आहे, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, तक्रार किंवा अर्ज कुठे करावा, न्यायालयीन प्रक्रियेत कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांना समजेल अशा पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे अनेक नागरिकांच्या मनातील कायद्याबाबतच्या शंका दूर झाल्या.
न्यायव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण करणे हा मुख्य उद्देश
शिबिराच्या प्रारंभी अॅड. अनिकेत निकम यांनी प्रास्ताविकातून ‘न्याय विश्वास फाउंडेशन’च्या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. सर्वसामान्य नागरिकांना कायद्याची माहिती मिळणे हा त्यांचा अधिकार असून, योग्य वेळी योग्य कायदेशीर मार्गदर्शन मिळाल्यास अनेक समस्या सुरुवातीलाच मार्गी लागू शकतात. नागरिकांच्या मनात न्यायव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण करणे आणि कायद्याविषयी जनजागृती करणे, हा फाउंडेशनच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांना कायदेशीर बाबींसाठी केवळ समस्या निर्माण झाल्यानंतरच नव्हे, तर त्यापूर्वीही योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जळगाव शहरातील प्रत्येक प्रभागात मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचा मानस असून, पुढील सहा महिन्यांनंतर जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातही अशा प्रकारची शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती अॅड. निकम यांनी दिली.
कायद्याची भीती न बाळगता नागरिकांनी आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची माहिती करून घ्यावी, तसेच कोणत्याही कायदेशीर अडचणीच्या वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, या उद्देशाने फाउंडेशनच्या उपक्रमांना पुढील काळात अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहता मोफत कायदेविषयक मार्गदर्शनाची गरज अधोरेखित झाली असून, अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्यांना न्यायप्रक्रियेच्या जवळ आणण्यास मदत होणार आहे.
