साईमत न्यूज नेटवर्क –
पूर्व चंपारण : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील अरेराज परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह तलावात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी तलावात पाच मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतांमध्ये आईसह तिच्या चार मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे बभनौली गावावर शोककळा पसरली आहे.
मृतांची ओळख सुशीला देवी (वय ३५), अमृता कुमारी (वय ११), अविनाश कुमार (वय ८), पम्मी कुमारी (वय ६) आणि रवी कुमार (वय ४) अशी झाली आहे. हे सर्वजण बभनौली गावातील रहिवासी होते. गुरुवारी संध्याकाळपासून सुशीला देवी आपल्या चार मुलांसह बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबीयांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला; मात्र त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.
शुक्रवारी सकाळी गावातील काही नागरिकांना तलावात पाच जणांचे मृतदेह दिसून आले. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाचही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सुशीला देवी गवत कापण्यासाठी गेल्या होत्या आणि त्यांच्यासोबत चारही मुले होती. त्याचवेळी तलावात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा महिलेच्या पतीने केला आहे. मात्र, एकाच वेळी पाच जणांचा तलावात बुडून मृत्यू होणे संशयास्पद मानले जात असून पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू आहे.
या प्रकरणात घातपात झाला आहे की ही आत्महत्येची घटना आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, गावात कुटुंबातील कौटुंबिक वादाच्या चर्चाही सुरू असून तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.
