शेती, घरे, रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश आ. मंगेश चव्हाण यांचे निर्देश
साईमत /चाळीसगाव / प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. पावसामुळे अनेक गावांमध्ये शेती, घरे, रस्ते, पूल तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीला प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका कृषी अधिकारी अभिषेक लगड, गटविकास अधिकारी मोरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच बहाळ, खेडगाव, खेडी, भवाळी, पोहरे, कळमडू, कुंझर, बोरखेडा आदी गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ प्रतिनिधींनीही बैठकीत सहभागी होत आपापल्या गावांतील नुकसानीची माहिती प्रशासनासमोर मांडली.
बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. पावसाच्या तडाख्यात वाहून गेलेली शेतजमीन, पिकांचे नुकसान, विहिरींची हानी, घरांची व झोपड्यांची पडझड, वाहून गेलेली जनावरे, रस्ते, पूल, शासकीय इमारती तसेच इतर सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाची मदत वेळेत मिळण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे. पंचनाम्यांची प्रक्रिया विलंब न करता पूर्ण करून नुकसान अहवाल तातडीने शासनाकडे पाठवावा, अशा सूचना आमदार चव्हाण यांनी दिल्या.
अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने तातडीने आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत. तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेऊन औषध फवारणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसामुळे खराब झालेले रस्ते व पुलांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कार्यवाही करावी, असेही बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी विविध गावांतील सरपंच आणि ग्रामस्थ प्रतिनिधींनी पावसामुळे निर्माण झालेल्या समस्या, शेतीचे नुकसान आणि आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना मांडल्या. आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना शासनाची मदत जलदगतीने पोहोचविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने, जबाबदारीने आणि समन्वयाने काम करावे, असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी केले.
