साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम उघडली असून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ६२.०७ ग्रॅम एमडी (Mephedrone) हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जिल्हाभरात अवैध अंमली पदार्थांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एमआयडीसीतील वखार महामंडळ (सेक्टर A-14) समोरील रस्त्यावर एक जण बेकायदेशीर अंमली पदार्थांची वाहतूक करणार आहे. या माहितीच्या आधारे ३१ जुलैच्या रात्री १०:४० वाजेच्या सुमारास पोलिसांनी गस्त घालत संशयित इम्रान खान हयात खान (वय ३६, रा. आव्हाणे, ह.मु. फातेमा नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज आढळून आले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
६२.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज: किंमत रु. २,८६,०००/-
एक मोबाईल फोन: किंमत रु. २०,०००/-
हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (MH-17-DL-4598): किंमत रु. ५०,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल: रु. ३,५८,०००/-
मालेगावच्या पुरवठादाराचाही सहभाग निष्पन्न
तपासादरम्यान या ड्रग्जचा पुरवठा मालेगाव (जि. नाशिक) येथील रफीक उर्फ गोल्डन याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी इम्रान खान आणि रफीक उर्फ गोल्डन या दोन्ही आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा व भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करत आहेत.
”जिल्ह्यातील तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्र केल्या जातील. नागरिकांनी अंमली पदार्थांच्या विक्री किंवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.”
— श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, जळगाव)
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि राहुल गायकवाड, पोनि बबन आव्हाड, सपोनि प्रमोद वाघ, पोउपनि दीपक जगदाळे, जितेंद्र वल्टे, सफौ अतुल वंजारी तसेच एलसीबी व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.
