निंबादेवी, वड्री, मोर, हरिपुरा धरणांसह शेळगाव बॅरेज व वाघझिरा तलाव परिसरात जाण्यास सक्त मनाई; यावल तहसीलदारांचे आदेश
साईमत /यावल/ प्रतिनिधी
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत यावल तहसील प्रशासनाने तालुक्यातील धरणे, तलाव व बॅरेज परिसरात प्रवेशबंदी लागू केली आहे. निंबादेवी, वड्री, मोर, हरिपुरा धरण, शेळगाव बॅरेज, वाघझिरा तलाव तसेच यावल येथील पाटचारी आणि तलाव परिसरात पुढील आदेश होईपर्यंत नागरिकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
यावलच्या तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मोहनमाला नाझीरकर यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. मान्सून काळात १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात तसेच तालुक्यात अतिवृष्टीची शक्यता असते. या काळात धरणे, तलाव आणि पाटांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जातो. तसेच मुसळधार पावसानंतर या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आणि पर्यटनासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मात्र, पाण्याची पातळी अचानक वाढणे, वेगवान प्रवाह निर्माण होणे आणि पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक असते. अशा घटना टाळण्यासाठी आणि मनुष्यहानी तसेच प्राणिहानी रोखण्यासाठी ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली असल्याचे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
त्यानुसार निंबादेवी धरण, वड्री धरण, मोर धरण, हरिपुरा धरण, वाघझिरा तलाव, यावल येथील पाटचारी, यावल तलाव तसेच शेळगाव बॅरेज या ठिकाणी नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करून संबंधित ठिकाणी कोणीही आढळल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तहसील प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्याच्या काळात स्वतःची व कुटुंबीयांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
