साईमत -यावल- प्रतिनिधी |
येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना झालेल्या कथित अपमानास्पद वागणुकीचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी सोमवारी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले. आंदोलनामुळे प्रकल्प कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, याअंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळांमधील प्रशासकीय प्रक्रियाही खोळंबली आहे.
कार्यालयात शंभर टक्के कामबंद पाळण्यात आल्याने नागरिक व विद्यार्थ्यांची कामे अडकून पडली आहेत. या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध सरकारी कर्मचारी संघटना तसेच सामाजिक संस्थांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलनस्थळी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या व आंदोलनाला पाठिंबा दिला.
दोषींवर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच
अधिकाऱ्यांचा सन्मान व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. संशयित आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आता याप्रकरणी पोलीस प्रशासन काय पावले उचलते, याकडे लक्ष लागले आहे.
