घरातून बाहेर पडले आणि परतलेच नाहीत दोन दिवसांनी शेतातील विहिरीत तरंगताना दिसला मृतदेह बेपत्ता व्यक्तीची ओळख पटली
साईमत /यावल /प्रतिनिधी
यावल तालुक्यातील वड्री गावातील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह शनिवारी गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही केली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूमागील कारणांचा तपास सुरू आहे.
सिकंदर उर्फ गफ्फार इस्माईल तडवी (वय ४५, रा. वड्री) हे गुरुवारी दुपारच्या सुमारास घराबाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. त्यांच्या पत्नीनेही विविध ठिकाणी संपर्क साधून पतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता.
शनिवारी सकाळी गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील बाळकृष्ण सदाशिव यांच्या शेतातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने यावल पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याची ओळख सिकंदर उर्फ गफ्फार इस्माईल तडवी अशी पटली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे वड्री गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.
