साईमत न्यूज नेटवर्क –
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली. नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथील चार मजली कोहिनूर अपार्टमेंट अचानक कोसळल्याने आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव व शोधमोहीम सुरू आहे.
माहितीनुसार, २००७ मध्ये उभारण्यात आलेल्या या इमारतीत दोन विंग आणि सुमारे ३० सदनिका आहेत. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही इमारत सुरुवातीपासूनच कमकुवत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेने तिला अतिधोकादायक इमारत म्हणून घोषित केले होते.
गुरुवारी तळमजल्यावरील काही खांब (पिलर) कमकुवत झाल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. सायंकाळी सहा वाजल्यापासून इमारतीला तडे जाऊ लागले, तर रात्री आठच्या सुमारास ती एका बाजूला झुकल्याचे स्पष्ट दिसून आले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रभाग समिती क्रमांक ४ चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत इमारत रिकामी करण्याची कारवाई केली.
प्रशासनाने इमारत रिकामी करण्याचे आवाहन केले असतानाही तळमजल्यावरील दुरुस्तीचे काम सुरूच होते. तसेच काही रहिवासी घरातील साहित्य काढण्यासाठी पुन्हा इमारतीत गेल्यानंतर अचानक संपूर्ण इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्यामुळे अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले.
घटनेनंतर तातडीने जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मलबा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या संयुक्त पथकांकडून बचावकार्य सुरू असून, अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे.
या दुर्घटनेत शमीम शेख (३२), रंजीत सिंग (४५), मिराज रसूल शेख (३४), संतोष कुमार पांडे (४२) आणि शमीम अन्सारी (३०) यांच्यासह एकूण नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. उर्वरित काही मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे.
