साईमत न्यूज नेटवर्क –
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात झालेल्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या संघटनांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणाने देशभरात मोठा संताप निर्माण झाला होता. या विरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. तब्बल ३६ दिवस चाललेल्या या आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली होती. काही ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला, तर जमाव नियंत्रणासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला होता. तसेच काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
आंदोलनाच्या अखेरच्या दिवशी अभिजित दीपके यांनी सरकारकडे विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केले नसल्याचा दावा कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) केला आहे. विद्यार्थ्यांवरील कारवाई कायम राहिल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अभिजित दीपके यांनी दिला आहे.
अभिजित दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत सरकारला इशारा दिला. विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक कारवाई थांबवली नाही तर सीजेपीकडून देशभरात शांततापूर्ण आंदोलन उभारले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनीही सरकारने विद्यार्थ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनांमध्ये विसंगती असल्याचा आरोप सीजेपीने केला आहे.
सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण
नीट आंदोलनादरम्यान सीजेपीने सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. यामध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी यांचा समावेश होता.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर उर्वरित मागण्यांबाबत सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मदत आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेत आश्वासन दिल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
मात्र, आता हे आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण झाले नसल्याचा आरोप करत सीजेपीने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकार या प्रकरणी पुढील काय भूमिका घेते, याकडे विद्यार्थ्यांसह देशाचे लक्ष लागले आहे.
