गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांचे हाल; निकृष्ट नियोजन अन् अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका वाढला
साईमत -नशिराबाद- प्रतिनिधी |
पावसाळा सुरू होताच नशिराबाद येथील पोलिस स्टेशन रोडलगत असलेल्या बोगद्याजवळील सर्व्हिस रोडवर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून ही समस्या ‘जैसे थे’ असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भुसावळ–जळगाव या मुख्य मार्गावरील हा सर्व्हिस रोड अत्यंत वर्दळीचा मानला जातो. या परिसरात शाळा, पेट्रोल पंप आणि अनेक व्यापारी आस्थापना असल्याने रोज शेकडो विद्यार्थी, कामगार व नागरिकांची येथून ये-जा असते. मात्र, रस्त्यावर पाणी साचल्याने या मार्गाला तळ्याचे स्वरूप आले असून वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे.
निकृष्ट बांधकाम अन् गटारींचा अभाव
रस्त्याच्या बांधकामावेळी पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उतार आणि बंदिस्त गटारींची सोय करण्यात आली नाही, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्त्यावरील पाण्यात उघड्या गटारी दिसत नसल्याने चालकांना मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, अतिक्रमण न हटवताच अरुंद रस्ता बांधल्यामुळे समोरासमोर दोन मोठी वाहने आल्यास रोज वाहतूक कोंडी होऊन वाद निर्माण होत आहेत.
एसटी चालकांनी बदलला मार्ग
रस्त्याची बिकट अवस्था आणि पाण्याची खोली पाहता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचालकांनी या सर्व्हिस रोडवरून जाणे टाळले असून, ते उड्डाणपुलावरील पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत.
“प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेऊन पाणी साचण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा. रस्त्याचे रुंदीकरण आणि गटारींची दुरुस्ती न झाल्यास येत्या दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा नशिराबाद येथील संतप्त नागरिकांनी व वाहनधारकांनी दिला आहे.
