साईमत न्यूज नेटवर्क –
इंदूर : लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या तरुणाने आपल्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथे उघडकीस आली आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मृत तरुणीचे नाव पलक असून ती आयसीआयसीआय बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत होती. ती हरदा जिल्ह्यातील टिमरनी येथील रहिवासी असून इंदूरमधील तपेश्वरी बाग कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होती. रविवारी तिच्या घरात जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. सुरुवातीला ही घटना स्वयंपाक करताना गॅसला आग लागल्याने झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
घटनास्थळी गॅस सिलिंडर आणि शेगडी वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली होती. तसेच शेगडीवर चिरलेली भाजीही आढळून आली होती. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूच्या दिशेने तपास सुरू केला होता. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
सीसीटीव्हीमध्ये एक तरुण चेहऱ्यावर कपडा बांधून पलकच्या घरातून बाहेर जाताना दिसून आला. त्याच्या पाठीवर बॅग होती. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशन तपासले असता हा तरुण मयांक शाक्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत मयांकने हत्येची कबुली दिली. मयांक कुलर दुरुस्तीचे काम करत असून, त्याची आणि पलकची सहा वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मयांक पलकसोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र, पलकच्या कुटुंबीयांनी या विवाहाला विरोध केला होता. तसेच तिचे लग्न दुसरीकडे ठरवण्यात आले होते.
याच कारणातून संतप्त झालेल्या मयांकने पलकच्या हत्येचा कट रचला. तो पेट्रोलची बाटली घेऊन तिच्या घरी पोहोचला. लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर मयांकने पलकला खाली पाडून तिचा गळा दाबला. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेमुळे पलकच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
