झाड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा अग्निशमन दलाच्या धावपळीने रस्ता मोकळा
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
शहरातील आर.आर. शाळेजवळील ताहेर ट्रान्सपोर्ट परिसरात मध्यरात्री अचानक एक विशाल निंबाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. झाड थेट रस्त्यावर आडवे पडल्याने वाहतुकीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. मात्र, घटना रात्री उशिरा घडल्याने त्या वेळी रस्त्यावर वर्दळ नसल्यामुळे मोठा अपघात टळला. सकाळी घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाड हटवून वाहतूक पूर्ववत केली.
परिसरातील अनेक वर्षांपासून उभे असलेले हे निंबाचे झाड शनिवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास अचानक कोसळले. झाडाच्या फांद्या आणि खोडामुळे संपूर्ण रस्ता अडला होता. झाड कोसळताना मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर आले. मात्र, त्या वेळी कोणतेही वाहन किंवा पादचारी झाडाखाली नसल्याने सुदैवाने जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
सकाळी स्थानिक नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधल्यानंतर अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पर्यावरण अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाड हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. आवश्यक सुरक्षेची काळजी घेत यंत्रसामग्रीच्या सहाय्याने झाडाचे मोठे खोड आणि फांद्या तुकडे करून बाजूला करण्यात आल्या. काही वेळातच रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत सुरू झाली.
या मदतकार्यात वाहनचालक मयूर ओतारी तसेच फायरमन संजय तायडे, किरण पाटील आणि रुपेश पाटील यांनी परिश्रमपूर्वक काम करत झाड हटविण्याची मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. प्रशासनाने वेळेवर दाखविलेल्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली असून, आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेची यंत्रणा किती सज्ज आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती नागरिकांना आली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाच्या जलद प्रतिसादाचे आणि कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले.
