फेगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर; एकुलत्या एका मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
साईमत /यावल /प्रतिनिधी
सातपुडा पर्वतरांगांच्या निसर्गरम्य परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या यावल येथील १७ वर्षीय तरुणाचा हरिपुरा धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवार दि. १९ रोजी दुपारी घडली. या घटनेने यावल शहरात शोककळा पसरली असून, एका होतकरू तरुणाच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मयत तरुणाचे नाव जयेश संजय फेगडे (वय १७, रा. महाजन गल्ली, यावल) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयेश फेगडे हा आपल्या चुलत भावासह व वहिनीसोबत सातपुडा डोंगररांगांमधील हरिपुरा धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. धरण परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेत असताना जयेश पाण्यात पोहण्यासाठी उतरला.
मात्र, पोहत असतानाच अचानक त्याचा पाण्यात तोल गेला आणि तो खोल पाण्यात बुडाला. ही घटना सोबत असलेल्या चुलत भाऊ व वहिनीच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र, अथक प्रयत्न करूनही जयेशला वाचवण्यात यश आले नाही.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. या दुर्दैवी घटनेमुळे हरिपुरा धरण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. जयेशचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून, याबाबतची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
जयेश फेगडे हा होमगार्ड संजय सिताराम फेगडे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्याच्या अकाली निधनाची बातमी यावल शहरात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली. मुलाच्या निधनाने फेगडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
दरम्यान, पावसाळ्यात धरणे, तलाव व जलाशयांमध्ये पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
