पहाटेच्या सापळ्यात गुटखा तस्कर जाळ्यात; आर्टिका कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा
साईमत /मुक्ताईनगर /प्रतिनिधी
मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या हद्दीत चोरट्या मार्गाने आणला जात असलेला प्रतिबंधित गुटख्याचा साठा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटेच्या कारवाईत उघडकीस आणला. मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी गुटख्यासह चारचाकी वाहन व मोबाईल असा एकूण १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गुटखा विक्री व वाहतूक करण्यास बंदी असतानाही परराज्यातून मोठ्या प्रमाणावर हा प्रतिबंधित माल आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना पूर्णाड फाट्याजवळून मध्य प्रदेशातून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली.
माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ जुलै रोजी पहाटे सापळा रचला. पहाटे साडेदोन वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशच्या दिशेने येणारी पांढऱ्या रंगाची आर्टिका कार (क्रमांक एमएच ३० एझेड ४६६४) संशयावरून थांबवण्यात आली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा व केसरयुक्त विमल पान मसाल्याचा साठा आढळून आला.
पोलिसांनी तातडीने वाहन ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आणले. तपासणीदरम्यान वाहनातील गुटख्याची किंमत ३ लाख ८६ हजार ९०८ रुपये असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय ९ लाख रुपये किमतीची आर्टिका कार आणि २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
चौकशीत हा गुटखा मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील पवन नामक व्यक्तीकडून आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी योगराज सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून खलील खान उल्ला खान (वय ३२, रा. खामगाव, जि. बुलढाणा), सय्यद अरिफ सय्यद हकीम उर्फ नदीम (वय ३५, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव) आणि पवन (रा. बुऱ्हाणपूर, पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा वाहतुकीला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे करीत आहेत.
