खेळता-खेळता काळाचा घाला सात वर्षीय अविनाशच्या मृत्यूने सावखेडा हादरले
साईमत /भुसावळ /प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील सावखेडा गावात शुक्रवारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला. सुकी नदीपात्रातील खोल पाण्याच्या खड्ड्यात पडून सात वर्षीय अविनाश राजू जवरे याचा मृत्यू झाला. खेळण्याच्या वयातच काळाने घाला घातल्याने जवरे कुटुंबासह गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे नदीपात्रातील वाळू उपशानंतर निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अविनाश हा सावखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दुसरीत शिकत होता. सायंकाळच्या सुमारास तो नदीकाठ परिसरात खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्याचा तोल गेला आणि तो थेट पाण्यात पडला. आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा ऐकून तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. काही वेळाने त्याला बाहेर काढण्यात आले आणि त्वरित उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
अविनाशच्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ तसेच आजी-आजोबा असा परिवार आहे. चिमुकल्याच्या निधनाने गावातील वातावरण शोकमय झाले असून, अनेकांनी जवरे कुटुंबाचे सांत्वन केले.
दरम्यान, सुकी नदीपात्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाळू उत्खननामुळे अनेक खोल खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे नदीकाठी जाणाऱ्या नागरिकांसह लहान मुलांच्या जीविताला सतत धोका निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अशा ठिकाणी कोणतीही संरक्षक व्यवस्था, इशारा फलक किंवा प्रतिबंधात्मक उपाय नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
या दुर्घटनेनंतर सुकी नदीपात्रातील सर्व धोकादायक खड्ड्यांचे तातडीने सर्वेक्षण करून ते सुरक्षित करण्यात यावेत, वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सावखेडा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
