साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी विद्यालयात लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या भव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि मान्यवरांच्या मांदियाळीत पार पडला. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक जीवनात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या याच महान कार्याच्या स्मृतींना या पुतळ्याच्या माध्यमातून उजाळा मिळाला असून, त्यांचा वैचारिक वारसा नव्या पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते धनंजय चौधरी तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रमुख पाहुण्यांनी बाळासाहेब चौधरी यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि विशेषतः खान्देशच्या शैक्षणिक विकासात चौधरी कुटुंबीयांचे योगदान मोठे आहे. हाच विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असा सूर या कार्यक्रमात उमटला. या सोहळ्यासाठी धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि जळगावकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
