साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलेले खोटे बोलण्याचे आरोप म्हणजे निव्वळ ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत,” असा जोरदार पलटवार काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. जळगावात माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीसांच्या जुन्या विधानांची आणि बदलेल्या भूमिकांची आठवण करून देत भाजपवर सडकून टीका केली.
जळगावातील धनाजी नाना विद्या प्रबोधिनी येथे स्वर्गीय चौधरी यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आलेले हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेवर काँग्रेसची आक्रमक भूमिका मांडली.
’त्या’ विधानांचे काय झाले? सपकाळांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना सपकाळ म्हणाले, “वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे पूर्वी कोणी म्हटले होते? तसेच, अजित पवार यांच्यासोबत कधीही युती होणार नाही, ते चक्की पिसिंग करतील, असेही त्यांनीच म्हटले होते. पुढे काय झाले, हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे.”
निसर्गाच्या अंदाजावरूनही टोला
नाशिकमधील हवामानाच्या अंदाजाचा दाखला देत सपकाळ पुढे म्हणाले, “काल नाशिकमध्ये ढगफुटी होईल, असा अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता, मात्र प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही.” मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी आपल्या राजकीय भूमिकांमध्ये बदल केला असून, त्यामुळे राज्यात नेमके खोटे कोण बोलते, हे जनतेला अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या या घणाघाती भाषणामुळे जळगावसह राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले असून, आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा कलगीतुरा अधिक रंगण्याची चिन्हे आहेत.
