‘स्माईल’ शिष्यवृत्ती योजनेतून दरवर्षी १३,५०० रुपयांची मदत
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने मार्फत ‘स्माईल (SMILE)’ योजनेअंतर्गत विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष १३,५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार असून अर्ज प्रक्रिया राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.
ही शिष्यवृत्ती योजना तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणातील अडथळे दूर करून त्यांना शैक्षणिक प्रवाहात स्थिरता मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. प्री-मॅट्रिक (इयत्ता ९ वी व १० वी), पोस्ट-मॅट्रिक (इयत्ता ११ वी व १२ वी), तसेच महाविद्यालयीन आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
शासनमान्य किंवा खासगी शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठात नियमित शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील. अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक असून सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवरून जारी करण्यात आलेले अधिकृत ट्रान्सजेंडर ओळखपत्र (Identity Certificate) बंधनकारक आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर Transgender SMILE Scholarship Portal या पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीच्या जागा मर्यादित असल्याने निवड प्रक्रिया मागील शैक्षणिक वर्षातील मेरिटच्या आधारे केली जाणार आहे. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र ठरतील.
शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने जमा केली जाणार आहे. त्यामुळे अर्जदाराचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे अनिवार्य आहे. या योजनेमुळे तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळून त्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
