साईमत -पाचोरा -प्रतिनिधी |
पाचोरा तालुक्यातून महिला व तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून, तिला शेतात गाठून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे.
फोनवरून दिला जात होता त्रास
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हर्षल मधुकर बडगुजर (रा. भडगाव) हा गेल्या काही दिवसांपासून पीडित तरुणीला सतत त्रास देत होता. तो पीडित तरुणीच्या वडिलांच्या मोबाईलवर वारंवार फोन करून, “मला तुझ्याशी लग्न करायचे आहे,” असे म्हणून मानसिक त्रास देत होता. मात्र, पीडित तरुणीने त्याच्या या मागणीला आणि लग्नाला स्पष्ट नकार दिला होता.
शेतात गाठून अश्लील चाळे; आरडाओरड केल्याने आरोपी पसार
लग्नाचा नकार पचवू न शकल्याने संशयित आरोपी हर्षल बडगुजर याने तरुणीचा पाठलाग केला. तालुक्यातील भडाई शिवारात असलेल्या एका शेतात तरुणीला एकटे गाठून त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे करत विनयभंग केला. यावेळी घाबरलेल्या पीडित तरुणीने प्रसंगावधान राखत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तरुणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक गोळा होणार, या भीतीने संशयित आरोपी हर्षल बडगुजर याने घटनास्थळावरून पळ काढला.
पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल
संशयित आरोपीच्या या सततच्या त्रासाला आणि शेतातील धक्कादायक प्रकाराला कंटाळून अखेर पीडित तरुणीने पाचोरा पोलीस ठाणे गाठले. तिने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी हर्षल मधुकर बडगुजर (रा. भडगाव) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली असून, फरार आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पाचोरा आणि भडगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.
