धन्वंतरी देवतेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब देऊन अभियानाची सुरुवात
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी (दि. २८ जून) शहरात पोलिओ लसीकरण मोहिमेचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी पारंपरिक पद्धतीने धन्वंतरी देवतेचे पूजन करून मोहिमेची अधिकृत सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून अभियानाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार राजूमामा भोळे यांनी माता व बालकांच्या आरोग्यसेवेवर विशेष भर देण्याची गरज व्यक्त केली. निरोगी बालक हे सक्षम आणि सुदृढ समाजाचे आधारस्तंभ असल्याचे ते म्हणाले. आरोग्य यंत्रणेने अधिक जबाबदारीने कार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे पोलिओ लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालकांना केले. पोलिओसारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
महापौरांनी पुढे सांगितले की, ३० जूनपासून शहरात आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन उर्वरित बालकांना पोलिओ लसीचे डोस देणार आहेत. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, आरोग्य विभागाचे उपसंचालक दिलीप सौंदळे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, राष्ट्रीय हिवताप अभियानाचे अधिकारी के. बी. नगराळे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ, डॉ. राम रावलानी, डॉ. स्वप्नील सोनवणे, इन्चार्ज परिचारिका प्रिया सूर्यवंशी तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव शहरात सुरू झालेली ही मोहीम पोलिओ निर्मूलनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून, प्रशासनाकडून नागरिकांच्या व्यापक सहभागावर भर दिला जात आहे.
