आईच्या डोळ्यासमोर वीजेचा घाला ,वीज कोसळून ३२ वर्षीय शेतकरी ठार
साईमत /अमळनेर/ प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे आज दुपारी घडलेल्या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेत वीज कोसळून एका ३२ वर्षीय युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आईच्या डोळ्यासमोर घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव राकेश रतिलाल पाटील असे असून, तो आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे १२ वाजता राकेश पाटील आपल्या आईसह आणि शेतमजुरांसोबत शेतात काम करत होते. अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू होताच राकेश आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी धावले. त्याच क्षणी त्यांच्या अंगावर विजेचा भयंकर आघात झाला आणि ते जागीच कोसळले.
घटनेच्या वेळी राकेशची आई आणि काही मजूर जवळच निंबाच्या झाडाखाली थांबलेले होते. आईच्या डोळ्यासमोरच मुलगा कोसळल्याने तिचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या प्रसंगामुळे उपस्थित मजुरांमध्येही भीती आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले.
राकेश पाटील यांचे वडील रतिलाल शालिग्राम पाटील हे गावातील आदर्श बागायतदार शेतकरी म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा त्रास झाल्याने शेतीची संपूर्ण जबाबदारी राकेश यांच्यावर आली होती. तरुण वयातच त्यांनी जबाबदारी स्वीकारत आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून शेती विकसित करण्याचा प्रयत्न केला होता.
वीज कोसळल्याने राकेश यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. त्यांच्या अंगावरील कपडे व गळ्यातील रुमाल जळाल्याचेही निदर्शनास आले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती कळताच शहापूर गावात एकच शोककळा पसरली. चार वर्षांपूर्वी विवाह झालेल्या राकेश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा गमावल्याने पाटील कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले आहे.
सायंकाळी सात वाजता शहापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
