सातारा/सांगली:
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या चर्चांदरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. “ज्यांना आमदार व्हायची इच्छा आहे, त्यांनी काळजी करू नये. देवाभाऊंकडे (देवेंद्र फडणवीस) दैवी शक्ती आहे आणि ती शक्ती सगळ्यांचं समाधान करणारी आहे,” असे गोरे यांनी म्हटले आहे. सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम विजयी झाल्यानंतर सांगलीतील सत्कार समारंभात ते बोलत होते.
”आम्ही चौघेही आमदार झालो”
आपला अनुभव सांगताना मंत्री गोरे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी मला, धैर्यशील कदम, अतूलबाबा आणि मनोजदादा अशा चौघांना तुम्ही विधानसभेत जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही चौघेही आमदार झालो. प्रामाणिकपणे काम केल्यावर देवाभाऊ पाठीशी ठाम उभे राहतात. त्यामुळे आता ज्यांना आमदार व्हायचंय, त्यांनी काळजी करू नका.” ठाकरे आणि शरद पवार गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांमध्येच हे विधान आल्याने राजकीय वर्तुळात याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाईंवर थेट निशाणा, महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर!
भाजपचे उमेदवार विजयी झाले असले, तरी या निवडणुकीत फुटलेल्या १०० मतांवरून महायुतीमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा यांच्यावर थेट निशाणा साधला. “अनेक लोकांच्या ओठात एक, मनात एक आणि करणीत आणखी वेगळं होतं. आम्ही नक्की हिशोब करू, हिशोबात आम्ही पक्के आहोत. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा महायुती सोबत राहिले का, हे आता देवालाच माहिती,” अशा शब्दांत त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, ३०१ मतांनी विजयी झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना कराड येथे अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
