साईमत न्यूज नेटवर्क –
विटा : साखर कारखान्यातून कमी दरात साखर पुरवठा करून देण्याचे आमिष दाखवत बनावट ई-वे बिल आणि जीएसटी बिलांचा वापर करून तब्बल ९ कोटी १६ लाख २५ हजार ९९ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विटा पोलिसांनी चार जणांसह साखर कारखान्याच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत आशिष आनंदराव पाटील यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक नेताजीराव मोरे, राजीव नेताजीराव मोरे (दोघे रा. बिरणवाडी, ता. तासगाव), अक्षय अनिल पाटील (रा. वायफळे), अभिजीत हनुमंत माने (रा. धनगाव, ता. पलूस) तसेच पिंपळनेर (ता. माढा, जि. सोलापूर) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
साखर पुरवठ्याचे आमिष अन् कोट्यवधींची फसवणूक
फिर्यादी आशिष पाटील आणि विशाल बाबासाहेब पाटील यांची विटा येथे ‘अन्नपूर्णा ट्रेडिंग’ नावाची भागीदारी फर्म असून, डिसेंबर २०२१ पासून ते साखर खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचे विविध कंपन्यांशी व्यवहार सुरू होते.
दरम्यान, आरोपी दीपक मोरे, राजीव मोरे आणि अक्षय पाटील यांनी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातून टेंडर दरापेक्षा कमी दरात साखर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या विश्वासावर आशिष पाटील यांनी वेळोवेळी मोठी रक्कम बँक व्यवहाराद्वारे आरोपींच्या खात्यावर जमा केली.
मात्र, प्रत्यक्षात साखरेचा पुरवठा न करता कारखान्याशी संगनमत करून बनावट ई-वे बिले आणि जीएसटी बिले तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. कागदोपत्री साखर पुरवठा झाल्याचे दाखवत फिर्यादीची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
धनादेश बाऊन्स; धमक्यांचाही आरोप
फसवणुकीची रक्कम परत देण्याचे आश्वासन देत आरोपींनी विविध करारपत्रे व प्रोमिसरी नोटा दिल्या होत्या. तसेच रकमेचे धनादेशही दिले. मात्र, हे धनादेश बँकेत जमा केल्यानंतर ते बाऊन्स झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
धनादेश परत आल्यानंतर जाब विचारल्यावर आरोपींनी खोट्या ॲट्रॉसिटी व खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.
विविध कलमांखाली गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेतील फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रांची निर्मिती, खोटी कागदपत्रे वापरणे, धमकी देणे आणि संगनमत करणे आदी आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित रामदास काळे करीत आहेत.
