तांबापुरात मध्यरात्री दगडफेकीचा थरार; दोन घरांची तोडफोड, पोलिसांचा कडक बंदोबस्त
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
शहरातील तांबापुरा परिसरातील बिस्मिला चौक येथे गुरुवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाल्याने परिसरात काही काळ दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत दोन घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, संतप्त जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. पोलिसांनी तातडीने अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास एका महिला आणि तरुणामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला हा वाद मर्यादित स्वरूपाचा असला तरी काही वेळातच त्याचे रूपांतर दोन गटांमधील मोठ्या संघर्षात झाले. दोन्ही बाजूंचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा झाल्यानंतर वातावरण चिघळले आणि एकमेकांवर जोरदार दगडफेक सुरू झाली.
दगडफेकीदरम्यान परिसरात मोठी धावपळ उडाली. या हिंसक प्रकारात दोन घरांची तोडफोड करण्यात आली असून, घरांच्या खिडक्या, दरवाजे व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांसह स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने संतप्त जमावाने पोलिसांनाही लक्ष्य केले. पोलिसांच्या वाहनांवर तसेच काही कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री साडेएक वाजेच्या सुमारास अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी कठोर पावले उचलत जमावाला पांगविले आणि परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळविले.
या प्रकरणी दोन्ही गटांतील संबंधितांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पहाटे उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे सहभागी व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, तांबापुरा आणि बिस्मिला चौक परिसरात सध्या कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणतीही अफवा पसरवू नये तसेच सामाजिक सलोखा कायम राखावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिसरात तणावपूर्ण शांतता कायम असल्याचे चित्र आहे.
