पार्टीनंतरच्या वादातून तरुणाचा खून; अपघाताचे नाटक करून दिशाभूल यावल पोलिसांकडून तिघे जेरबंद
साईमत /यावल/ प्रतिनिधी
यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील २६ वर्षीय तरुणाच्या मृत्यूमागील गूढ अखेर उलगडले असून अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा ठरला आहे. मित्रांसोबत झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या करून त्याला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मृताच्या तिघा मित्रांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोळन्हावी येथील पवन रवींद्र सोळंके (वय २६) याला बुधवारी मध्यरात्रीनंतर काही युवकांनी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत तो गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविला होता.
मात्र, घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या. मृतदेहावरील जखमांचे स्वरूप आणि घटनास्थळावरील परिस्थिती अपघाताशी सुसंगत नसल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन व गुन्हे शोध पथकाने संशयितांची कसून चौकशी केली. त्यातून पवनचा मृत्यू वाहनाच्या धडकेत नसून मारहाण आणि दगडाने ठेचून करण्यात आल्याचे उघड झाले.
पार्टीतून सुरू झाला वाद
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पवन आणि त्याचे काही मित्र बुधवारी रात्री शेतातील पार्टीसाठी एकत्र जमले होते. पार्टीनंतर काही जण घरी निघून गेले, मात्र पवन व त्याचे तीन मित्र किनगाव परिसरात गेले. तेथून किनगाव-डांभुर्णी मार्गावरील पाटचारीवर गेल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात तिघांनी पवनला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला.
अपघाताचा बनाव; पोलिसांनी उधळला कट
हत्येनंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अपघाताचा बनाव रचला. पवनचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाल्याचे भासवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या सूक्ष्म तपासामुळे आरोपींचा हा कट फसला आणि संपूर्ण सत्य समोर आले.
याप्रकरणी उमेश दिलीप परदेशी (रा. कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी व लोकेश दिवाकर महाजन (दोघे रा. डांभुर्णी) यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकानेही तपासणी केली असून पुढील तपास सुरू आहे.
मित्रांनीच मित्राचा जीव घेतल्याच्या या धक्कादायक घटनेमुळे कोळन्हावी व डांभुर्णी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
