निपुण भारत अभियानाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन; गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, या शाळा म्हणजे नव्या पिढीला घडविणारे खरे मंदिर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
निपुण भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन गुरुवार, २१ मे २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीत निपुण भारत अभियानाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पटसंख्या वाढविणाऱ्या शाळांना विशेष प्रोत्साहन
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीकरणावर भर दिला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच शाळांमध्ये पटसंख्या वाढविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
येत्या काळात ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा पटसंख्या वाढविण्यात यशस्वी ठरतील, त्या शाळांना जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. तसेच गुणवत्ता आणि पटसंख्या वाढविणाऱ्या शाळांचा जिल्हास्तरावर विशेष गौरव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
“एकही शाळा निपुण झाल्याशिवाय राहता कामा नये”
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शिक्षकांना स्पष्ट उद्दिष्टे देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केवळ पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांचे अवांतर ज्ञान, कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यासाठी योग्य धोरण आखून कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देतानाच विद्यार्थ्यांच्या निपुण क्षमतेचा दरमहा जिल्हा आणि तालुका स्तरावर आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या स्वतंत्र बैठका घेऊन कामाचा थेट वेध घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
“जिल्ह्यातील एकही शाळा निपुण झाल्याशिवाय राहता कामा नये. यासाठी शिक्षण विभागाने एकत्रित आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे,” अशा कडक शब्दांत करिश्मा नायर यांनी शिक्षण विभागाला निर्देश दिले.
निपुण भारत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी प्रशासनाने आता अधिक कठोर आणि नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.
