पेट्रोल-डिझेलसाठी नागरिकांची धावपळ, प्रशासन अलर्ट मोडवर
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला असून काही ठिकाणी पूर्णपणे इंधन संपल्याने विक्री थांबवण्यात आली आहे. परिणामी वाहनधारकांना इंधनासाठी ठिकठिकाणी रांगा लावाव्या लागत असून अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरासह ग्रामीण भागातही या टंचाईचा परिणाम जाणवत असून दैनंदिन प्रवास, मालवाहतूक आणि अत्यावश्यक सेवांवरही त्याचा फटका बसत आहे. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज सायंकाळी साडेसहा वाजता महत्त्वाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीला पेट्रोल पंप मालक, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत जिल्ह्यातील इंधन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना, साठा वितरणाचे नियोजन आणि पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कोणती पावले उचलता येतील यावरही भर दिला जाणार आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन साठा न करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या असून लवकरच इंधन पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
इंधन टंचाईमुळे जिल्ह्यात निर्माण झालेली ही परिस्थिती गंभीर मानली जात असून सर्वांच्या नजरा आता प्रशासनाच्या बैठकीकडे लागल्या आहेत.
