साईमत न्यूज नेटवर्क –
छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या दिव्यांग मुलाची निर्घृण हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या अमानुष कृत्यामागे स्वतः जन्मदाताच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, आई-वडील दोघेही सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब काही दिवसांपूर्वी रोजगाराच्या शोधात शहरात स्थलांतरित झाले होते. आर्थिक अडचणी आणि मुलाच्या दिव्यांगत्वामुळे निर्माण झालेल्या तणावातून ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस तपासातून व्यक्त केला जात आहे. मुलाचा मृतदेह हरसुल-सावंगी बायपास परिसरातील शेतात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन पंचनामा केला असून प्राथमिक तपासात गळा आवळून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालातही मुलाच्या चेहऱ्यावर व डोक्यावर मारहाणीच्या खुणा आढळल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, मृत मुलाच्या हातात खाऊचे पाकीट असल्याची बाबही तपासात समोर आल्याने ही घटना अधिकच हृदयद्रावक ठरली आहे.
घटनेनंतर आई-वडील फरार झाल्याने पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून दिव्यांग मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे चर्चेत आला आहे. समाजातील असुरक्षित घटकांच्या संरक्षणासाठी कठोर उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
