३१ मेपूर्वी कागदपत्रांची पूर्तता अनिवार्य
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापूर्वी स्कूलबस आणि व्हॅनची सर्व कागदपत्रे पूर्णपणे वैध असल्याची खात्री करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) हे कठोर निर्देश जारी केले असून ३१ मे २०२६ पूर्वी सर्व परवानाधारक वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक ठरवले आहे.
या निर्देशानुसार, शालेय वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, परवाना, पीयूसी, विमा तसेच इतर अनुषंगिक कागदपत्रे वैध असणे आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापनाने स्वतः पुढाकार घेऊन सर्व स्कूलबस व व्हॅनची प्रत्यक्ष तपासणी करावी आणि कागदपत्रे अपूर्ण असल्यास संबंधित वाहनचालक व मालकांना ती तात्काळ वैध करून घेण्याच्या सूचना द्याव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कागदपत्रे पूर्ण आणि वैध असल्याशिवाय कोणत्याही वाहनास शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित, नियमानुसार आणि अपघातविरहित व्हावी यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी काटेकोर दक्षता घ्यावी, असेही आरटीओकडून बजावण्यात आले आहे.
तपासणीदरम्यान कोणत्याही वाहनाची कागदपत्रे अपूर्ण आढळल्यास संबंधित वाहन तत्काळ जप्त केले जाईल. अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या गैरसोयीसाठी पूर्णपणे शाळा व्यवस्थापन व वाहनधारक जबाबदार राहतील, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व परवानाधारक स्कूलबस व व्हॅन मालक आणि चालकांनी त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, वाहनकर तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची ३१ मेपूर्वी पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विशेष बाब म्हणून अतिरिक्त अपॉइंटमेंट (विशेष कोटा) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत ही मोहीम राबविण्यात येणार असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
