सकाळपासून धडक कारवाई; हॉकर्सकडून लपवून ठेवलेले साहित्य जप्त, परिसरात खळबळ
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
शहरातील फुले मार्केट परिसरात वाढलेल्या अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेने पुन्हा एकदा कठोर पवित्रा घेत मोठी कारवाई केली. मंगळवार, १२ मे रोजी सकाळपासून अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक मोहीम राबवत गल्लीबोळांमध्ये लपवून ठेवलेले हॉकर्सचे साहित्य जप्त केले. या कारवाईत सुमारे ३० ते ३५ पेट्या आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या असून परिसरात एकच खळबळ उडाली.
फुले मार्केट आणि आसपासच्या भागातील अतिक्रमण तसेच अस्वच्छतेच्या तक्रारींची दखल घेत काही दिवसांपूर्वी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज काळे आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीनंतर नगरसेवक रमेश मतानी यांनीही महापौरांकडे निवेदन देत अतिक्रमण हटविण्याची मागणी तीव्र केली होती. त्यानंतर महापालिकेने कारवाईचा निर्णय घेतला.
मागील काही दिवसांपासून अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सातत्याने मोहिमा राबवल्या जात असून, मंगळवारी सकाळी ८ वाजता पथकाने फुले मार्केट परिसरात अचानक धडक दिली. कारवाईदरम्यान रस्त्यालगत तसेच गल्लीबोळांमध्ये लपवून ठेवलेले टेबल, पेट्या आणि विक्री साहित्य शोधून ताब्यात घेण्यात आले.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांनी सांगितले की, फुले मार्केटमध्ये अधिकृत हॉकर्स व्यवसाय थांबवण्यात आला आहे. मात्र काही व्यावसायिक अद्यापही लपूनछपून व्यवसाय करत असून सार्वजनिक जागेचा वापर अडथळा निर्माण करण्यासाठी करत आहेत. अशा प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कारवाईदरम्यान काही ठिकाणी हॉकर्सकडून विरोध झाल्याची माहितीही प्रशासनाने दिली. तरीही शहरातील बाजारपेठा आणि रस्ते मोकळे ठेवण्यासाठी ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे.
