मंत्री संजय सावकारे यांच्या हस्तक्षेपामुळे डिझेल संकटावर पडदा
साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी :
शहरातील कचरा संकलनाचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला असून रात्रीपासून घंटागाड्यांद्वारे कचरा उचलण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या थेट हस्तक्षेपामुळे घंटागाड्यांना डिझेल पुरवठा थांबण्याचा अडथळा दूर झाला असून शहरातील स्वच्छता व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषदेच्या थकित देयकांमुळे पेट्रोल पंप चालकाने डिझेल पुरवठा बंद केला होता. परिणामी घंटागाड्यांची सेवा ठप्प झाली होती आणि शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याच काळात स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या कंपनीनेही काम थांबवल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सावकारे यांच्याकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली. त्यानंतर त्यांनी संबंधित पंपचालकाशी चर्चा करून विश्वास निर्माण केला आणि डिझेल पुरवठा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले. या चर्चेनंतर पंपचालकाने सकारात्मक भूमिका घेतली असून आजपासून शहरातील कचरा संकलनाचे काम पुन्हा सुरू झाले आहे.
दरम्यान, मंत्री सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नगरपरिषदेतील राजकीय घडामोडी आणि स्वच्छता व्यवस्थेतील अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. शासनाने गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत त्यांना नगराध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केले असून त्यांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर १४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
नगरपरिषदेच्या नियमानुसार नगराध्यक्ष अपात्र ठरल्यास उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्याकडे तात्पुरता पदभार जाणे अपेक्षित आहे. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे प्रशासनात अनिश्चितता निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला.
नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत आरोप करत सांगितले की, काही वर्षांपासून सुरळीत असलेली घंटागाडी व्यवस्था सध्याच्या कारभारामुळे विस्कळीत झाली आहे. पूर्वी स्वच्छतेबाबत शहराला पुरस्कार मिळाला होता, मात्र आता नियोजनाचा पूर्ण बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुख्याधिकारी रजेवर असल्याने प्रशासनातील कामकाजावरही परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला.
माजी आमदार संतोष चौधरी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरही या वेळी प्रतिक्रिया देण्यात आली. शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असून मूलभूत सेवांवर राजकारण नको, असे मत काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्षा, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, घंटागाडी सेवा पुन्हा सुरू झाल्याने भुसावळकर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण शहरातील कचरा संकलन पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
