जामनेरमधील अड्ड्यावर छापा, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
साईमत/जामनेर / प्रतिनिधी :
आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या टोळीवर जळगाव पोलिसांनी धडक कारवाई करत जामनेर शहरातील हिवरखेडा रोड परिसरातील एका घरावर छापा टाकला. या कारवाईत तब्बल १० लाख ५७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
दिनांक ९ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरखेडा रोड परिसरातील एका घरामध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावून जुगार खेळवला जात आहे. या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
त्याअनुषंगाने प्रोबेशनरी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस स्टेशनच्या अधिकारी-अंमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने माहितीची खातरजमा करून जामनेर येथील संशयित घरावर छापा टाकला असता तेथे आयपीएल सामन्यांवर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याचे उघड झाले.
या कारवाईत देवानंद सुभाष सोनवणे, रितेश अशोक नेरकर, परीक्षित रविंद्र पाटील आणि प्रवीण जगन्नाथ टहाकडे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्व आरोपी हे जामनेर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
छाप्यात पोलिसांनी ९ लाख २ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम, १ लाख ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, २५ हजार रुपये किमतीचा टीव्ही व साउंडबार, तसेच ४१ एटीएम कार्ड आणि इतर साहित्य असा एकूण १० लाख ५७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कौशल्यपूर्ण आणि उल्लेखनीय कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
