जळगावात एकाच दिवशी लोक अदालतीचे आयोजन
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित राहिलेल्या खटल्यांमुळे नागरिकांना होणारा आर्थिक खर्च, मानसिक ताण आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच वाद आपसातील सामोपचाराने मिटावेत या उद्देशाने ९ मे २०२६ रोजी देशभर एकाच दिवशी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यात ही राष्ट्रीय लोक अदालत जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात पार पडणार असून, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे.
या लोक अदालतीसाठी जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महानगरपालिका प्रशासन यांचेही सहकार्य लाभणार आहे.
या लोक अदालतीमध्ये मोटार वाहन ट्रॅफिक चलन, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, म्युनिसिपल अपील, तसेच विविध दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडयोग्य प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. याशिवाय खटला दाखलपूर्व प्रकरणांवरही सुनावणी होणार आहे.
विशेष म्हणजे, राष्ट्रीयकृत बँका, वित्तीय संस्था, कंपन्या तसेच दूरसंचार कंपन्यांची मोठ्या प्रमाणातील थकबाकी प्रकरणेही या लोक अदालतीत समाविष्ट असून, त्यातून मोठ्या प्रमाणात वसुली होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही प्रकरणांमध्ये थकित रकमेवर सवलत देण्याचे प्रस्तावही संबंधित संस्थांकडून ठेवण्यात आले आहेत.
ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे तडजोडीने निकाली काढायची आहेत, त्यांनी आपल्या वकिलांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी केले आहे. तसेच ऐनवेळी तडजोडीने खटले निकाली काढण्याची संधीही उपलब्ध राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एकाच दिवशी न्याय, तडजोड आणि समाधान मिळविण्याची ही सुवर्णसंधी असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
