विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग; संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण चर्चा
साईमत चोपडा प्रतिनिधी
चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण आणि यशस्वी वातावरणात पार पडला. विविध महाविद्यालयांतील सदस्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे मेळाव्याला विशेष रंगत आली. दादासाहेब डॉ. सुरेश पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पंकज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच समाजकार्य महाविद्यालयातील सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मेळाव्याची सुरुवात ‘एन-मुक्ता’ जळगाव जिल्हाध्यक्ष नितीन बारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख अतिथी म्हणून कांचन महाजन व पवन पाटील उपस्थित होते. प्रारंभी प्रा. डॉ. चंद्रकांत देवरे यांनी संघटनेचे गीत सादर करून वातावरणात ऊर्जा निर्माण केली. प्रास्ताविक प्रा. डॉ. लालचंद पटले यांनी मांडत मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला.
व्यासपीठावर प्रा. डॉ. रमाकांत बागूल, प्रा. डॉ. हरीष चौधरी आणि प्रा. डॉ. क्रांती वाघ यांची उपस्थिती लाभली. मेळाव्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच पदोन्नती प्राप्त प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमादरम्यान सदस्यांनी आपल्या विविध समस्या व मागण्या मांडल्या. त्यावर मार्गदर्शन करताना नितीन बारी यांनी संघटनेच्या माध्यमातून सर्व स्तरांवर प्रयत्न करून या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित सदस्यांना दिलासा मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. अनंत देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. कुणाल गायकवाड, प्रा. डॉ. किशोर पाठक तसेच चोपडा समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. के. पाटील यांनी प्रभावीपणे केले.
स्नेहभोजनानंतर मेळाव्याची आनंददायी वातावरणात सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमातून संघटनेचे बळकटीकरण व शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नांवर एकत्रित विचारमंथन घडून आले.
