तक्रारदारांनाच ‘थर्ड डिग्री’ची धमकी; आंदोलनानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई
साईमत चोपडा प्रतिनिधी
चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. गो-रक्षकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आणि तक्रारदारांनाच ‘थर्ड डिग्री’ देण्याची धमकी दिल्याचे प्रकरण साळवे यांना महागात पडले असून, वाढत्या दबावानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
घटनेचा उगम चोपडा येथील रामपुरा कचरा डेपो परिसरात झालेल्या एका संशयित गो-वंश तस्करी प्रकरणातून झाला. या ठिकाणी गो-रक्षकांवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला. मात्र, तक्रार नोंदवण्याऐवजी पोलीस निरीक्षक साळवे यांनी तक्रारदारांवरच गुन्हे दाखल करण्याची भाषा केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर संबंधितांना ‘थर्ड डिग्री’ देण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिल्याचेही समोर आले, ज्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विविध हिंदुत्ववादी संघटनांनी साळवे यांच्या निलंबनाची मागणी करत आंदोलन छेडले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पाच दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत मधुकर साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्यांच्या जागी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांची नियुक्ती करण्यात आली असून, शहर वाहतूक शाखेची जबाबदारी आता संजय गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
दोन दिवसांत दोन अधिकाऱ्यांवर कारवाई
जळगाव पोलीस दलात अल्पावधीतच दोन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. १६ एप्रिल रोजी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी कावेरी कमलाकर यांनाही नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मधुकर साळवे यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे प्रशासनाचा कडक संदेश पोलीस यंत्रणेत गेला असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणामुळे पोलीस कामकाजातील उत्तरदायित्व, नागरिकांशी वर्तन आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
