कराची–ओरमारा–ग्वादर किनारपट्टीवर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र चाचणीचा संशय; भारताने २४ तास आधीच समुद्रात वाढवली नजर
साईमत / नवी दिल्ली
अरबी समुद्रात पाकिस्तानकडून सुरू असलेल्या संशयास्पद लष्करी हालचालींवर भारताने तत्काळ आणि निर्णायक पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. पाकिस्तान एका गुप्त क्षेपणास्त्र चाचणीच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त होत असतानाच भारतीय नौदलाने अत्याधुनिक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग प्रणालीने सुसज्ज असलेली युद्धनौका ‘आयएनएस ध्रुव’ अरबी समुद्रात तैनात करून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.
पाकिस्तानने १४ आणि १५ एप्रिलदरम्यान कराची, ओरमारा, ग्वादर आणि सोनमियानी या किनारपट्टी भागात विस्तृत सागरी क्षेत्र ‘प्रतिबंधित झोन’ म्हणून जाहीर केले होते. सुमारे ४१५ ते ४५० किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या लष्करी किंवा क्षेपणास्त्र चाचणीसाठी आधीच सागरी इशारा (नोटीस) जारी करण्यात आला होता. लष्करी भाषेत अशा प्रकारच्या सूचनेला ‘नोटम’ म्हणून ओळखले जाते.
भारतीय नौदलाने मात्र या हालचालींचा सुगावा वेळेत घेत २४ तास आधीच ठोस पावले उचलली. पाकिस्तानने जाहीर केलेल्या कालावधीच्या एक दिवस आधीच, म्हणजे १३ एप्रिल रोजीच भारताने ‘आयएनएस ध्रुव’ अरबी समुद्रात तैनात करून संभाव्य धोका लक्षात घेत समुद्रातील निगराणी अधिक तीव्र केली.
‘आयएनएस ध्रुव’ ही युद्धनौका शत्रूच्या क्षेपणास्त्रांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी अत्याधुनिक सेन्सर आणि ट्रॅकिंग प्रणालीने सुसज्ज आहे. या तैनातीमुळे पाकिस्तानच्या संभाव्य रणनीतीला मोठा अडथळा निर्माण झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, पाकिस्तानकडून कोणत्या प्रकारच्या क्षेपणास्त्राची चाचणी होणार होती, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या किंवा समुद्रातून डागता येणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी घेण्याच्या तयारीत असण्याची शक्यता आहे.
या घडामोडींमुळे अरबी समुद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन्ही देशांच्या हालचालींकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष लागले आहे.
